वनराज आंदेकर हत्येला एक वर्ष;टोळीचा मोठा प्लॅन; पोलिसांकडे टीप अन् सगळचं फिस्कटलं नेमकं काय घडलं होत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:48 IST2025-09-02T18:48:26+5:302025-09-02T18:48:59+5:30
वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले..

वनराज आंदेकर हत्येला एक वर्ष;टोळीचा मोठा प्लॅन; पोलिसांकडे टीप अन् सगळचं फिस्कटलं नेमकं काय घडलं होत...
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. नाना पेठेत घडलेल्या या घटनेला एक वर्ष पूर्ण झालय. मात्र वर्षभराच्या आतच खून का बदला खून असा कट आंदेकर टोळीने रचला होता. मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक टीप मिळाली. आणि आंदेकर टोळीचा हा प्लॅन फसला नेमकं काय झालं? पोलिसांना काय टीप मिळाली होती? आणि पोलिसांनी वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्याचा कट कसा उधळला..
नेमकं काय घडलं ?
१ सप्टेंबर २०२४, रविवारचा दिवस.. वेळ रात्री साडेआठची.. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर आपल्या एका मित्रासह जेवण करून घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर ते मुख्य रस्त्यावर आले. आणि इतक्यात दबा धरून बसलेल्या १० ते १५ हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. बंदुकीच्या ५ गोळ्या झाडल्या, कोयत्याचे वार केले. अवघ्या काही सेकंदाचा हा खेळ.. आणि त्यानंतर हे हल्लेखोर आले तसेच पसार झाले.. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं... मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वनराज आंदेकरचा मृत्यू झाला होता.. पुढे पोलिसांच्या तपासात २३ आरोपींची नावे निष्पन्न झाली.. यातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडसह 23 जणांना अटक झाली. त्यांच्यावर मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई झाली.. मात्र हे सर्व आरोपी तुरुंगात असले तरीही आंदेकर टोळी काही शांत बसली नाही.. आंदेकर टोळीने खून का बदला खून असं म्हणत ज्या दिवशी वनराज आंदेकरची हत्या झाली होती त्याच दिवशी सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील एकाच्या हत्यचा कट रचला होता.. मात्र खबऱ्यांकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची टीप मिळाली.. आणि हत्तेचा हा कट उधळला गेला..
वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले.. याच पार्श्वभूमीवर शहरात काहीतरी अघटीत घडणार याची कुणकुण गुन्हे शाखेच्या पोलिसांना आधीच लागली होती.. त्यामुळे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या गुंडांवर वॉच ठेवला होता.. आणि पुणे पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली.. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी आंबेगाव परिसरातून एका तरुणाला ताब्यात घेतलं.. आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून मोठा कट उघडकीस आला.. या परिसरात सोमनाथ गायकवाडचं घर आहे त्या परिसरात हा तरुण रेकी करत होता.. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात आंदेकर टोळीचे काही गुंड त्याच दिवशी भारती विद्यापीठ परिसरात वावरत असल्याचं निष्पन्न झालं.. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अन गणेशोत्सवात रचलेला खुनाचा कट उधळला गेला..
खरंतर आंदेकर टोळी खुनाचा बदला घेण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वात मागील काही दिवसांपासून रंगली होती... आंदेकर टोळीने यासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्रांची जमवाजमव सुरू केली होती.. टारगेटही ठरलं होतं.. आणि रविवारी रात्री हल्ल्याचा कट ही रचला गेला.. मात्र आधीपासूनच सतर्क असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंदेकर टोळीचा हा कट हाणून पाडला.. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरीही आंदेकर टोळीच्या निशान्यावर नेमकं कोण होतं याचा खुलासा अद्याप झाला नाही..
आंदेकर टोळी मागील २५ वर्षांपासून गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे.. पुण्याच्या मध्यवर्ती भागात दहशत पसरवणाऱ्या या टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर हा आहे.. खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, अपहरण करणे, खंडणी उकळणे यासारखे गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत.. पुण्यातील फरासखाना, समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात या टोळीच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.. काही वर्षांपूर्वी आंदेकर आणि माळवदकर या दोन गुन्हेगारी पोळ्यांमध्ये वर्चस्वावरून भडका उडाला होता.. आणि या टोळी युद्धातूनच प्रमोद माळवदकर या गुंडाचा खून झाला होता.. या खून प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला शिक्षाही झाली होती.. शिक्षा भोगून परत आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण केली होती.. मात्र एक सप्टेंबर २०२४ या दिवशी वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली.. आणि यातील प्रमुख सूत्रधार हा कधीकाळी आंदेकर टोळीचा सदस्य असलेला सोमनाथ गायकवाड हा होता.. त्यामुळे परत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीतील एकाला संपवण्याचा कट आंदेकर टोळीने रचला होता.. मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला.