चांदी चोरीतील एकाला उत्तर प्रदेशातून बेड्या; खडक पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:14 IST2025-10-02T15:14:39+5:302025-10-02T15:14:56+5:30
- ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदी जप्त, इतरांचा शोध सुरू

चांदी चोरीतील एकाला उत्तर प्रदेशातून बेड्या; खडक पोलिसांची कारवाई
पुणे : शहरातील गुरुवार पेठेतील तब्बल ४० वर्षे जुन्या असलेल्या सराफा पेढीवर चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल ७० किलो चांदीचे दागिने चोरी केल्यानंतर खडक पोलिसांनी एकाला उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून यावेळी ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. चोरी केल्यानंतर त्याने रेल्वेने उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी चांदी नेली होती. गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राजेश महाराणीदिन सरोज (३६, रा. माघी चैनगड, थाना महेशगंज, ता. कुंडाख, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
१४ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी तीन पोती भरून ६७ लाख ६० हजारांचे ७० किलोंपेक्षा अधिक चांदीचे दागिने चोरून नेले होते. यामध्ये ६२ लाखांची चांदी तर ५ लाख रोख होते. चांदीच्या दागिन्यांनी भरलेली पोती (सिमेंटच्या गोणीच्या आकाराची) वाहून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. याप्रकरणी विनोद देवीचंद परमार (४१, रा. मुकुंदनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. परमार यांच्या ३८१, गुरुवार पेठेतील माणिक ज्वेलर्स नावाच्या दुकानातून ही चांदीची चोरी झाली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून खडक पोलिस ठाण्याच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांची दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरांतील वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक तपास करण्यात आला. यातील संशयित आरोपी गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने उत्तर प्रदेश येथे गेले असल्याचे दिसून आले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, अंमलदार कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे यांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले.
१८ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील कुंडा येथे हे पथक दाखल झाले. आरोपीचा माग काढून त्यांनी राजेश सरोज याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्याच्याकडील ३६ किलो ४४२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने काढून दिले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, शर्मिला सुतार, उपनिरीक्षक स्वप्निल बनकर, पोलिस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, नीलेश दिवटे, शुभम केदारी, योगेश चंदेल, मयूर काळे यांच्या पथकाने केली.
आरोपी हे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ परिसरातील असून, प्रतापगढ परिसरातील बहुतांश लोक हे पुणे व मुंबई येथे हमालीचे व मजुरीचे काम करतात. तपासादरम्यान आरोपी हे त्यांच्या गावाकडील पुणे, मुंबई येथील सहकाऱ्यांकडे राहून अशा प्रकारची चोरी करत असल्याचे दिसून आले.