मौजमजेसाठी पदवीधर तरुणाकडून दुचाकी चोरीचे गुन्हे;तरुणाकडून १४ दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:31 IST2025-07-12T19:31:35+5:302025-07-12T19:31:47+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी गरड याला संशयावरून ताब्यात घेतले.

मौजमजेसाठी पदवीधर तरुणाकडून दुचाकी चोरीचे गुन्हे;तरुणाकडून १४ दुचाकी जप्त
पुणे : मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरलेल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी तरुण सोशल मीडियावरील जाहिरात यंत्रणेचा (मार्केट प्लेस) वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून साडेआठ लाख रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
महादेव शिवाजी गरड (२६, सध्या रा. मांजरी, हडपसर, मूळ रा. चाकूर, जि. लातूर) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी गरड याला संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची माहिती मिळाली. गरड याची चौकशी केल्यानंतर त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गरडने हडपसर भागातून सहा दुचाकी, पिंपरी-चिंचवड शहरातून पाच दुचाकी अशा १४ दुचाकी चोरल्या आहेत. अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे, अभिजित पवार, विनोद शिवले, प्रताप गायकवाड विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती तुपे, पल्लवी मोरे यांनी ही कामगिरी केली.
दुचाकी विक्रीसाठी सोशल मीडियावरील ‘मार्केटप्लेस’चा वापर
आरोपी महादेव गरड हा पदवीधर असून, झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केले. दुचाकी चोरल्यानंतर तो सोशल मीडियावरील ‘मार्केटप्लेस’द्वारे कमी किमतीत दुचाकींची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. खासगी वित्तीय संस्थांचे हप्ते थकल्याने दुचाकींची स्वस्तात विक्री करत असल्याची बतावणी ग्राहकांना करायचा, असे गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.