पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या नऊ जणांना पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:37 IST2025-03-11T13:35:30+5:302025-03-11T13:37:28+5:30
कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला : पोलिस घेणार शोध

पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणाऱ्या नऊ जणांना पोलिस कोठडी
पुणे : सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला.
पुणे मेट्रोच्या पुणे महापालिका स्थानकाजवळच्या रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी रुळासह वायरीचे नुकसान केले आहे. मेट्रोसारख्या संवेदनशील ठिकाणीच आंदोलन करण्यामागे आंदोलकांचा घातपाताचा हेतू होता का, त्यांनी मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.
विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी (दि. ९) दुपारी दोन तास पुणे महापालिका मेट्रो स्थानकाच्या रुळावर उतरून आंदोलन करीत आंदोलनकर्त्यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या अंगावर चक्क पेट्रोल ओतणाऱ्या या आंदोलकांना सोमवारी (दि. १०) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोणताही आदेश नसताना आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालय यांसारख्या शासकीय कार्यालयांऐवजी मेट्रोसारखे संवेदनशील ठिकाणच का निवडले, आरोपी वारंवार माध्यमांना बोलवा, असे म्हणत होते, त्यामागे त्यांचा कोणता उद्देश होता. त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील श्रीधर जावळे आणि तपास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केली.
आंदोलक विरोधी पक्षातर्फे समाजहिताचे आंदोलन करत होते. मेट्रो स्थानकावर आंदोलकांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यांच्याकडे पेट्रोल होते, ही पोलिसांनी रंगविलेली कहाणी आहे. यातून मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असा युक्तिवाद आरोपींचे वकील ॲड. आदित्य झाड आणि ॲड. सिद्धार्थ राठोड यांनी केला.