पत्नी-प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; नातेवाइकांचे पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:45 IST2025-08-26T11:45:30+5:302025-08-26T11:45:51+5:30

भीमाच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्या तरुणाकडून भीमाला सातत्याने धमक्या मिळत होत्या. याबाबत भीमाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता

pune crime news tired of the harassment of his wife and lover, the husband took extreme steps; Relatives protested in front of the police station | पत्नी-प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; नातेवाइकांचे पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन

पत्नी-प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; नातेवाइकांचे पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे भीमा बबन रेणके (वय ३३) या तरुणाने सिद्धेश्वर मंदिर परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन दुपारी तीनच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी भीमाने एक चिठ्ठी लिहिली आणि व्हॉट्सॲपवर याबाबत माहिती शेअर केली होती. याप्रकरणी मयताच्या नातेवाइकांनी भीमाच्या पत्नी, तिच्या प्रियकर आणि त्यांना साथ देणाऱ्या अन्य व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत खेड पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे.

खेड पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नातेवाइकांनी भीमाच्या आत्महत्येला त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह अन्य व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. नातेवाइकांच्या माहितीनुसार, भीमाच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्या तरुणाकडून भीमाला सातत्याने धमक्या मिळत होत्या. याबाबत भीमाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता; परंतु पोलिसांनी समज देऊन त्याची फिर्याद नोंदवली नव्हती. यामुळे निराश होऊन भीमाने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

भीमाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याच्या पत्नी, तिच्या प्रियकर आणि त्यांना साथ देणाऱ्या अन्य व्यक्तीचा उल्लेख केला होता. ही चिठ्ठी त्याने व्हॉट्सॲपवर शेअर केली होती. चिठ्ठी पाहिलेल्या व्यक्तींनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत भीमाने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करत नातेवाइकांनी सायंकाळी चार वाजल्यापासून खेड पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलन सुरूच होते. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. खेड पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार मोहन अवघडे यांनी सांगितले की, नातेवाइकांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली असून, लवकरच कारवाई पूर्ण होईल. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: pune crime news tired of the harassment of his wife and lover, the husband took extreme steps; Relatives protested in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.