पोलिस असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने मनी लॉण्ड्रिंगच्या केसची धमकी; २७ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:54 IST2025-08-16T12:53:22+5:302025-08-16T12:54:29+5:30
बदनामी आणि अटकेपासून बचाव करण्यासाठी तक्रारदाराने संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरुवात

पोलिस असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने मनी लॉण्ड्रिंगच्या केसची धमकी; २७ लाखांचा गंडा
पुणे : पोलिस असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने एकाला मनी लॉण्ड्रिंगच्या केसमध्ये अटक करण्याची धमकी दिली. होम अरेस्ट टाळण्यासाठी रक्कम पाठवण्यास भाग पाडून तब्बल २७ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २८ जुलै ते ६ ऑगस्ट कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ५६ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढव्यात राहायला असून, २८ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून पोलिस असल्याची बतावणी केली. मनी लॉण्ड्रिंगच्या केसमध्ये अटक करण्याची धमकी देऊन त्यांना धमकावले.
होम अरेस्ट टाळण्यासाठी सायबर चोरट्याने तक्रारदाराला रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यामुळे बदनामी आणि अटकेपासून बचाव करण्यासाठी तक्रारदाराने संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरुवात केली. तब्बल २७ लाख रुपये पाठवल्यानंतरही त्यांच्याकडे रक्कम पाठवण्याची मागणी करण्यात आली. संशय आल्यामुळे त्यांनी इतरांकडे विचारपूस केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर करत आहेत.