पुण्यात ड्राय डेच्या मध्यरात्री दारूविक्री;तक्रारदाराला शिवीगाळ; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:11 IST2025-08-16T15:09:44+5:302025-08-16T15:11:16+5:30
ड्राय डे असूनही बॉलर पबमध्ये मध्यरात्री दारूविक्री सुरू असल्याची माहिती तक्रारदार सलमान खान यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल

पुण्यात ड्राय डेच्या मध्यरात्री दारूविक्री;तक्रारदाराला शिवीगाळ; गुन्हा दाखल
पुणे - ड्राय डेच्या मध्यरात्री पबमध्ये दारूविक्री सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर तक्रारदारालाच पबमध्ये उपस्थित व्यक्तीने पोलिसांच्या उपस्थितीत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बॉलर पबमध्ये उपस्थित व्यक्ती आर्यन नवले याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली. सलमान खान यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, ड्राय डे असूनही बॉलर पबमध्ये मध्यरात्री दारूविक्री सुरू असल्याची माहिती तक्रारदार सलमान खान यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पाहणी करत असताना तक्रारदारालाही पबच्या आत जाऊ देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यावेळी पबमध्ये उपस्थित आर्यन नवलेने तक्रारदाराला आत येण्यास मज्जाव केला, तसेच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी दुहेरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्राय डेला दारूविक्री केल्याप्रकरणी बॉलर पबच्या मॅनेजरविरोधात स्वतंत्र गुन्हा पोलिसांनी तत्काळ नोंदवला होता. मात्र, त्याच वेळी घडलेल्या शिवीगाळ आणि धक्काबुक्कीच्या घटनेचा गुन्हा तत्काळ नोंदवण्यात आला नाही.
तक्रारदाराने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेबाबत विचारणा केली असता वरिष्ठ अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. म्हणजेच पोलिसांच्या उपस्थितीत घडलेला प्रकार असूनही त्वरित कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या येरवडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, ड्राय डेच्या रात्री घडलेल्या या वादग्रस्त घटनेमुळे पबच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.