कासारवाडीत रात्रीच्या वेळी अडवून रिक्षाचालकाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:43 IST2025-10-02T14:42:36+5:302025-10-02T14:43:04+5:30
- पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

कासारवाडीत रात्रीच्या वेळी अडवून रिक्षाचालकाला लुटले
पिंपरी : रिक्षाचालकाला थांबवून पैशाची मागणी करून पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (२८) रात्री कासारवाडीतील लांडगे मळा येथे घडली.
दापोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलिक मच्छिंद्र पाटोळे (वय ३७, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार चंदू काळे (२५, कासारवाडी) आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रिक्षाचालक आहेत.
ते रविवारी रात्री भाडे सोडून घरी जात असताना कासारवाडी रेल्वेस्टेशनच्या पाठीमागील बाजूस, लांडगेमळा येथे संशयितांनी त्यांना थांबवले आणि पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ओंकार याने दगड कुंडलिक यांच्या डोक्यात मारला आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या खिशातून ८३० रुपये रोख रक्कम आणि १० हजारांचा मोबाइल फोन जबरदस्तीने चोरून नेला.