असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:35 IST2026-03-05T12:34:14+5:302026-03-05T12:35:53+5:30

- ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत माहिती समजताच सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावोगावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

pune crime news polices bravery foiled the kidnappers' plot; Two arrested in Kapurhol kidnapping case | असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद

असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद

नीरा : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथून १८ वर्षीय पृथ्वीराज दळवी याचे भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस येताच संपूर्ण पुणे ग्रामीणसह नीरा परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत माहिती समजताच सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावोगावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

१९९९ साली नीरेतील १४ वर्षीय अमित सोनवणे या विद्यार्थ्याच्या अपहरणानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेची आठवण अजूनही ताजी असल्याने “इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये” या भीतीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून अन्य आरोपींही पोलिसांच्या टप्प्यात आहेत.

अपहरणकर्त्यांनी पृथ्वीराजला काळ्या रंगाच्या एक्सयूव्ही गाडीत बसवून वेगाने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पुणे व सातारा जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली. प्रमुख मार्गांवर नाकेबंदी करून संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली. नीरा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक रविराज कोकरे, हरिश्चंद्र करे आणि प्रसाद कोळेकर यांनी तातडीने जेऊरच्या दिशेने धाव घेतली. जेऊर परिसरात मांडकीकडून भरधाव येणाऱ्या काळ्या गाडीवर त्यांची नजर खिळली आणि थरारक पाठलागाला सुरुवात झाली. सरकारी वाहनाचा सायरन वाजताच अपहरणकर्त्यांनी गाडी पिसुर्टी रोडकडे वळवली; मात्र अरुंद रस्त्यामुळे वाहन उसाच्या शेतात जाऊन अडकले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी पृथ्वीराजला शेतात सोडून पळ काढला.

पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत संध्याकाळी डोंगरमाथ्यावरून अक्षय लक्ष्मण इंगूळकर व अक्षय दत्तात्रय भालेराव (रा. मांजरी, हडपसर) यांना जेरबंद केले. आरोपी अटकेत गेल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रात्री उशिरा पृथ्वीराज सुखरूप असल्याची बातमी नीरेत पोहोचताच समाधानाची लाट उसळली. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी संबंधित पोलिसांचा सत्कार करून त्यांच्या ‘सर्जिकल नाकेबंदी’चे कौतुक केले.

या धाडसी कारवाईबद्दल शौर्य पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी होत असून जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. थरार, भीती आणि आशेच्या या संघर्षात अखेर विजय ठरला तो पोलिसांच्या धाडसाचा.

Web Title : पुलिस ने अपहरण विफल किया; कापूरहोळ मामले में दो गिरफ्तार।

Web Summary : कापूरहोळ में त्वरित पुलिस कार्रवाई से एक 18 वर्षीय अपहृत युवक को बचाया गया। नाटकीय पीछा के बाद दो संदिग्ध गिरफ्तार, समुदाय को राहत।

Web Title : Police foil kidnapping; two arrested in Kapurhol case.

Web Summary : Swift police action in Kapurhol led to the rescue of a kidnapped 18-year-old. Two suspects are arrested after a dramatic chase, bringing relief to the community.