बाणेर-हिंजवडी आयटी हबमध्ये कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा; २३ जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:00 IST2025-10-05T09:59:22+5:302025-10-05T10:00:33+5:30
टी डब्ल्यू डे या कंपन्यांच्या संचालक व व्यवस्थापकांसह एकूण २३ जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

बाणेर-हिंजवडी आयटी हबमध्ये कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा; २३ जणांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : शहरातील बाणेर–हिंजवडी आयटी परिसरात कोट्यवधी रुपयांचा मोठा गुंतवणूक घोटाळा उघडकीस आला असून, शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टी डब्ल्यू डे या कंपन्यांच्या संचालक व व्यवस्थापकांसह एकूण २३ जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार समीर नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर असून, त्यांच्यासोबत इतर अनेक कंपन्यांचे डायरेक्टर व मॅनेजर सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी प्रार्थना प्रथमेश मशीलकर (२८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना सुरुवातीला ‘लर्निंग सोल्युशन्स’ या क्लासमार्फत शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण घेण्याच्या बहाण्याने या नेटवर्कशी जोडण्यात आले. त्यानंतर टी डब्ल्यू डे इव्हेंट्स व इतर संलग्न कंपन्यांकडून गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले. गुंतवणूकदारांना सुरुवातीला १० लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ३ टक्के मासिक परतावा, १० लाखांपेक्षा जास्त रकमेवर ४ टक्के, तर २५ लाखांपर्यंत ५ टक्के मासिक परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. पहिल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना वेळेवर रक्कम परत मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. अनेकांनी बँक व अन्य ठिकाणांहून कर्ज काढून पैसे गुंतवले.
फिर्यादी प्रार्थना मशीलकर यांनी विविध बँकांतून कर्ज घेऊन तब्बल ३२ लाख रुपये गुंतवले. त्यांनाही सुरुवातीला परतावा मिळत राहिला. मात्र, मार्च २०२५ पासून सर्वांचेच पेमेंट बंद झाले. कंपनीकडून कधी ‘आयकर विभागाची प्रक्रिया सुरू आहे’, तर कधी ‘परदेशी गुंतवणूक येणार आहे’ अशी कारणे देण्यात आली. टी डब्ल्यू डे इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग सोल्युशन्स, आयटी सोल्युशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, बिझनेस कन्सल्टिंग, मीडिया, लॉजिस्टिक, सोशल रिफॉर्म, ॲसेट्स अशा तब्बल दहाहून अधिक कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांना पैसे गुंतवायला लावले गेले. या सर्वांचे नियंत्रण नार्वेकर दाम्पत्याकडेच होते.
या प्रकरणी समीर व नेहा नार्वेकर यांच्यासह प्रतीक जासदकर, रोहित म्हसके, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, अमित बालम, किरण कुंडले, सूरज सैंकासने, प्रणव बोर्डे, संकेश घाग, सिद्धेश पाटील, अविनाश कदम, सचिन पाटील, देवा घाणेकर, स्वप्निल देवले, सौरभ बोरडे, प्रसन्ना करंदीकर, मोहन कोरगावकर, माहेश्वरी पाटणे, रघुवीर महाडिक, ऋषिकेश पाटील आणि सोनाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेकडो गुंतवणूकदार अडचणीत..
काहींनी १० लाख, काहींनी २५ ते ५० लाख, तर एका गुंतवणूकदाराने तब्बल २.८३ कोटी रुपये गुंतवले होते. बहुतांश गुंतवणूकदारांनी कर्ज घेऊन गुंतवणूक केलेली असल्याने त्या कर्जाचे हप्ते फेडणे त्यांना अशक्य झाले आहे. अनेकांवर बँकेकडून वसुलीदेखील सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींवर बेकायदा ठेवी योजना (प्रतिबंध) अधिनियम २०१९ च्या कलम २१ व २३ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) व ६१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.