Crime News : दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:04 IST2026-03-14T14:03:49+5:302026-03-14T14:04:19+5:30
सौरभ कसबेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

Crime News : दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ?
भिगवण : मदनवाडी (ता. इंदापूर) येथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या सौरभ कसबे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिकेत भिसे यांनी भिगवण पोलिस ठाण्यात केली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी एका हॉटेल व्यावसायिकाने आणि त्याच्या साथीदाराने सौरभ कसबे यांना दुपारी २ वाजेच्या सुमारास ''दहा मिनिटांत परत येतो'' असे सांगून घरातून नेले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सौरभ यांना विजेचा धक्का बसल्याचा फोनवरून कळविण्यात आले. त्यांना त्वरित तक्रारवाडी येथील लाइफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते गंभीर स्थितीत होते. उपचार सुरू असताना ५ मार्च रोजी सौरभ यांचा मृत्यू झाला. चौकशीत संबंधित हॉटेलचालक आणि त्याच्या साथीदाराने सौरभ यांना वेल्डिंगच्या दुकानावर नेल्याचे समोर आले आहे. त्या ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारेवर विद्युत आकडा टाकण्यास सांगितल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी सौरभ यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी संबंधित दोघे उपस्थित असूनही त्यांना वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न केला गेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. सौरभ हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूसाठी संबंधित दोनच जबाबदार असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कसबे कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीची दखल न घेतल्यास मातंग समाज तसेच इतर संघटनांच्या वतीने भिगवण पोलिस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही अनिकेत भिसे यांनी दिला आहे.