खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांचा ड्रग्जचा अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:29 IST2025-10-02T10:26:02+5:302025-10-02T10:29:36+5:30
जुलैच्या महिनाअखेरीस खराडी येथील हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून कारवाई

खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांचा ड्रग्जचा अहवाल निगेटिव्ह
पुणे : खराडी येथील ड्रग्ज पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक झाली होती. मात्र, नुकताच या प्रकरणात आरोपींच्या ड्रग्ज सेवनाचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांचा ड्रग्जचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुलैच्या महिनाअखेरीस खराडी येथील हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. या पार्टीत अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली होती.
त्यांच्याकडून २ ग्रॅम ७० मिलिग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल, सुगंधी तंबाखू, दोन कार आणि दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, प्रांजल खेवलकरच्या रक्तात ड्रग्ज आढळले नसल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. काही दिवसांपूर्वी फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.