भूतानी तरुणीवरील अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:58 IST2025-08-21T18:58:15+5:302025-08-21T18:58:40+5:30
आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पीडिता ही काही वर्षांपूर्वी शिक्षण व नोकरीच्या उद्देशाने पुण्यात आली होती.

भूतानी तरुणीवरील अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे : भूतानची रहिवासी असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या दोन आरोपींचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुचेता टाकळीकर यांनी ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तीवर मंजूर केला.
अविनाश नोएल सूर्यवंशी व मुद्दसीर इस्माईल मेमन अशी जामीन मंजूर केलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पीडिता ही काही वर्षांपूर्वी शिक्षण व नोकरीच्या उद्देशाने पुण्यात आली होती. तिच्या मित्राने शंतनू कुकडे याच्याशी तिची ओळख करून दिली होती. कुकडे याने पीडितेची राहण्याची व जेवणाची सोय करून दिली. मात्र, पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पीडितेशी वेळोवेळी शारीरिक संबंध केले. तसेच कुकडेसह इतर आरोपींनीही पीडितेशी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
याबाबत पीडितेने आरोपींविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर इतर आरोपींसह अविनाश नोएल सूर्यवंशी व मुद्दसीर इस्माईल मेमन यांनाही अटक करण्यात आली. आरोपींचे वकील अॅड. पवार यांनी युक्तिवाद केला की, या गुन्ह्याशी दोन्ही आरोपींचा काहीही संबंध नाही. सह आरोपींसमवेत त्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.