Ayush komkar : नाना पेठेत बेकायदा बॅनर लावणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:21 IST2025-10-04T16:18:15+5:302025-10-04T16:21:02+5:30
- उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंदेकर टाेळीविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

Ayush komkar : नाना पेठेत बेकायदा बॅनर लावणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात गुन्हा
पुणे : नाना पेठेतील डोक तालमीजवळ बेकायदा बॅनर (फ्लेक्स) लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर, प्रियंका कृष्णा आंदेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाना पेठेतील इनामदार काॅम्प्लेक्स इमारतीच्या परिसरात आंदेकर टोळीने बेकायदा बॅनर लावले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंदेकर टाेळीविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बेकायदा बॅनर प्रकरणात आणखी एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाना पेठेतील एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदा बॅनर लावल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार सचिन गायकवाड तपास करीत आहेत. आंदेकर टोळीने केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली. या कारवाईत पत्र्याचे शेड, तात्पुरते केलेले बांधकाम, तसेच गणेश पेठेतील नागझरीत बेकायदा सुरू केलेल्या मासळी बाजारात ही कारवाई करण्यात आली.