आरोपी अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू शकतो; दत्तात्रेय गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:41 IST2025-09-01T17:40:26+5:302025-09-01T17:41:04+5:30
आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याने महिलेवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केला असून, त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षाने के

आरोपी अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू शकतो; दत्तात्रेय गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील अटक केलेला आरोपी दत्तात्रेय गाडे याचा पहिला जामीन अर्ज आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच फेटाळण्यात आला असल्याने परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याने महिलेवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केला असून, त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा निकाल दिला.
स्वारगेट स्थानकातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी गाडेविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी केलेला पहिला अर्ज सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फेटाळला. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत गाडेने पुन्हा आपल्या वकिलांमार्फत दुसरा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. हा बलात्कार नसून, परस्पर सहमतीने संबंध आहेत. आरोपीची पत्नी व दोन मुले त्याच्यावर अवलंबून आहेत. या प्रकरणी तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झाले असल्याने परिस्थितीत बदल झाला आहे. या आधारावर आरोपीला जामीन द्यावा, असा बचाव ॲड. वाजेद खान बिडकर यांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि तरुणीच्या वकील श्रिया आवले यांनी विरोध दर्शविला. आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केला असून, या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.