मटका किंग नंदू नाईकचा दबदबा संपला; एमपीडीए कायद्याअंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:43 IST2025-03-20T14:42:43+5:302025-03-20T14:43:06+5:30
नंदू नाईक अनेक दशकांपासून पुण्यातील मटका आणि जुगार व्यवसायाचा बादशहा होता.

मटका किंग नंदू नाईकचा दबदबा संपला; एमपीडीए कायद्याअंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी
-किरण शिंदे
पुणे - पुण्यातील अवैध धंद्यांचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदू नाईक ( वय ७ २ )याला अखेर एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे. ६३ गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या नाईकवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदू नाईकच्या जुगार व्यवसायामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला. १७ मार्च २०२५ रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नाईकला नागपूर कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार खडक पोलिसांनी त्याला अटक करून नागपूरला रवाना केले.
दरम्यान, शुक्रवार पेठ परिसरात दहशत निर्माण करणारा नंदू नाईक अनेक दशकांपासून पुण्यातील मटका आणि जुगार व्यवसायाचा बादशहा होता. कधी पोलिसांना लाखोंच्या ऑफर देणे, तर कधी दुचाकीसाठीही खास ड्रायव्हर ठेवणे. असे त्याचे किस्से शहरभर गाजत होते. अशात आता मटका किंगचा दबदबा संपला ? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
आधीही सुटला होता… पण यावेळी सुटका कठीण?
यापूर्वीही त्याच्यावर MCOCA अंतर्गत कारवाई झाली होती, मात्र त्याने न्यायालयातून सुटका करून घेतली होती. यावेळी मात्र MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध केल्याने किमान वर्षभर तरी तो बाहेर येऊ शकणार नाही. पोलिसांच्या या कारवाईनंतर पुण्यातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.