Pune: गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात; सासूच्या जाचाला कंटाळून सुनेने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:24 IST2025-03-27T16:23:52+5:302025-03-27T16:24:41+5:30
Pune Crime: सासूची येरवडा कारागृहात रवानगी: तणावाची परिस्थिती नीरा पोलीसांनी हाताळली

Pune: गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात; सासूच्या जाचाला कंटाळून सुनेने उचललं टोकाचं पाऊल
नीरा: येथील सासूने शारीरिक व मानसिक छळ केल्याने एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नीता सचिन निगडे (वय ३३) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सासूची आता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजया निगडे-जगताप ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिनवणी करणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे, नवीन फ्लॅट घेतलाय राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून नीता यांनी नीरा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत. सदर घटना २२ मार्च रोजी घडली होती. २५ मार्च रोजी विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तीला आता येरवडा कारागृहात पाठण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७) माध्यमांना दिली आहे.
पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल.
दरम्यान, नीता यांनी रहत्या घरी गळफास घेतल्यानंतर नीरा व जेजुरी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. माहेरचे लोक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नीरा पोलीस दुरक्षेत्रात आल्यावर प्रचंड संतापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता नीरेचे फौजदार सर्जेराव पुजारी, घनशाम चव्हाण, हरिश्चंद्र करे यांनी माहेरच्यांची समजूत काढत कायदेशीर कारवाई करू असे आश्वासीत केले. अंत्यविधी वेळी ही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात
नीता यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या पतीने नीरा शहरात एक फ्लॅट घेतला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फ्लॅट मध्ये हे कुटुंब रहावयास जाणार होते. यावरून सासू सुनेला कुरबुर करतं होती. आता पत्नीच्या पश्चात फ्लॅट मध्ये या तीन मुलांचे संगोपन कसे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.