Pune Crime : कोरेगाव भीमात गांजा विक्रीसाठी दोन युवक जेरबंद; अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:48 IST2026-01-21T12:48:28+5:302026-01-21T12:48:41+5:30
उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांच्या पिशवीची झडती घेतली असता गांजाच्या पुड्या आढळून आल्या.

Pune Crime : कोरेगाव भीमात गांजा विक्रीसाठी दोन युवक जेरबंद; अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त?
कोरेगाव भीमा : काही महिन्यांपूर्वी सणसवाडी (ता. शिरूर) येथे गुटख्याच्या मोठ्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असतानाच आता याच भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा युवकांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यासह एका अल्पवयीन युवकाला अटक करण्यात आली आहे.
सणसवाडी येथील पुणे–नगर महामार्गालगत दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी दोन युवक येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस हवालदार दामोदर होळकर, राकेश मळेकर व मच्छिंद्र निचित यांनी सणसवाडी परिसरात सापळा रचला. एका दुकानासमोर दोन संशयित युवक उभे असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांच्या पिशवीची झडती घेतली असता गांजाच्या पुड्या आढळून आल्या.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाइल फोन व गांजाचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिस हवालदार दामोदर तुळशीराम होळकर (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर करीत आहेत.
अवैध धंद्यांना वरदहस्त कोणाचा?
सणसवाडी हद्दीत यापूर्वी लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला असून मटका, नशेली पान आदी अवैध व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. त्यात आता गांजा विक्रीही उघडकीस आल्याने या परिसरातील अवैध धंद्यांच्या वाढीमागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.