- हिरा सरवदेपुणे : घरगुती कारणावरून पत्नीचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बोगद्याजवळीत डोंगरात टाकण्यासाठी रात्री दीड वाजता दुचाकीवरून जाणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गस्तीवरील पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. पोलिसांनी त्याच्या दुचाकीवरील पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यात महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.राकेशकुमार रामनाईक निशाद (वय २८ वर्षे, रा. समृद्धी ग्रीन्स बिल्डिंग, फ्लॅट नं. १०६, साईधाम सोसायटी, लायगुडेमळा, धायरी पुणे, मूळ रा. चकोरागाव, पोस्ट घडा, ता. फत्तेपूर बसखारी, उत्तर प्रदेश) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉस्टेबल ज्ञानेश्वर आखाडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आखाडे आणि त्यांचे सहकारी नील सूरज लोंढे हे सिंहगड रोड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आखाडे आणि लोंढे दोघेही सोमवारी रात्र पाळीसाठी होते. पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ते रात्री गर्दीच्या आणि निर्जन स्थळांना भेटी देऊन पाहणी करीत होते.पेट्रोलिंगदरम्यान रात्री दीडच्या सुमारास त्यांना एक जण ॲक्टिव्हा गाडीवर पोत्यामध्ये काही तरी घेऊन नऱ्हे येथील भुमकर चौकाकडून स्वामी नारायण चौकाकडे जाताना दिसला. आखाडे व लोंढे यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला. पोलिस मागे लागल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो स्वामी नारायण मंदिराजवळ दुचाकी सोडून पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने आपले नाव राकेशकुमार रामनाईक निशाद असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला पोत्यामध्ये काय आहे, असे विचारल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यावेळी त्यांना ॲक्टिव्हा गाडीच्या पुढील बाजूस ठेवलेल्या पोत्यातून पाय बाहेर आल्याचे दिसले. त्याबाबत विचारणा केली असता त्याने पोत्यामध्ये आपली पत्नी बबिता असून, घरगुती कारणावरून तिचा गळा दाबून खून केला आहे.
तसेच तिचा मृतदेह बोगद्याजवळील डोंगरात टाकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. हा गंभीर प्रकार लक्षात येताच आखाडे व लोंडे यांनी याबाबत सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक सावंत यांना फोन करून माहिती दिली. ते घटनास्थळी आल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून बबिता यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. हा गुन्हा समृद्धी ग्रीन्स बिल्डिंग, धायरी येथे घडल्याने गुन्ह्याची नोंद नांदेड सिटी पोलिस ठाण्यात करण्यात आली.