माणगावात कार चालकाचा खून करून पसार झालेले अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:21 IST2026-01-14T19:20:32+5:302026-01-14T19:21:09+5:30
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका कार चालकाचा खून केला होता. खून करून तिघेजण कार घेऊन पसार झाले होते.

माणगावात कार चालकाचा खून करून पसार झालेले अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई
पुणे : रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात एका कार चालकाचा खून करून पसार झालेल्या तिघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. अनिकेत महेश वाघमारे (२६, रा. लक्ष्मी विहार अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड), तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (२४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) आणि ओंकार विजय केंजळे (रा. पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघमारे, पाटोळे, केंजळे यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका कार चालकाचा खून केला होता. खून करून तिघेजण कार घेऊन पसार झाले होते. बाणेर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी प्रीतम निकाळजे हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी वाघमारे ननावरे पुलाजवळ थांबला असून, तो कार विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती निकाळजे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ननावरेला पकडले. त्याच्या ताब्यातून कार जप्त करण्यात आली.
चौकशीत वाघमारे, साथीदार पाटोळे, केंजळे यांनी माणगाव परिसरात एका कार चालकाचा खून केल्याची कबुली दिली. माणगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वाघमारेसह साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिरूमुला रजनीकांत, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्य मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, प्रीतम निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतिरक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.