लोणीकंद हादरले..! मुलीशी गैरवर्तन; लग्नाचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:34 IST2026-01-07T16:33:45+5:302026-01-07T16:34:22+5:30
लोणीकंद भागात अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य आणि विवाहाच्या आमिषाने पळवून नेल्याच्या घटना

लोणीकंद हादरले..! मुलीशी गैरवर्तन; लग्नाचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक
पुणे : लोणीकंद भागात आठ वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य तसेच वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. संजय जाधव (५०, रा. खुटाळे वस्ती, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय पीडित मुलीशी आरोपी जाधव हा गेल्या वर्षभरापासून अश्लील कृत्य करत होता. याप्रकारची कोणाला माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. मुलगी घाबरलेली असल्याने तिने आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. आईने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो) जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.
दरम्यान, वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींनी मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.