कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:28 IST2025-07-04T12:27:00+5:302025-07-04T12:28:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा संतप्त सवाल

कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण?
पुणे - कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करून आरोपी सदनिकेत शिरल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. कायदा व सुव्यवस्था रामभरोसे, जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था जागतिक पातळीची असणे गरजेचे आहे. मात्र, केंद्रातील मोदी-शाह व राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारच्या अवकृपेने पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था अक्षरशः रामभरोसे आहे. पुणे शहरातील आमच्या माता भगिनी स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत हे दाहक वास्तव आहे. पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं ?
एका २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका २८ ते ३० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपी सदनिकेजवळ आला. त्याने दरवाजा वाजवला. तरुणीने सदनिकेचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडला. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी केली. तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले आणि दरवाजा उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिचे डोळे जळजळले. त्यानंतर आरोपी सदनिकेत शिरला.
त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे छायाचित्र काढले आहे. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तरुणीने पोलिसांना केलेल्या आरोपीच्या वर्णनावरून त्याचा शाेध घेतला जात आहे.