Pune Crime : मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली जुहूच्या व्यावसायिकाची पुण्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:13 IST2026-01-06T12:11:09+5:302026-01-06T12:13:19+5:30
- व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी पुण्यातील मॉलमध्ये प्रीमियम रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

Pune Crime : मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली जुहूच्या व्यावसायिकाची पुण्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक
पुणे : शहरातील विमाननगर येथील ‘इस्ट कोर्ट फिनिक्स मार्केट सिटी’ या नामांकित मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फिनिक्स मिल्स लिमिटेड, वमोना डेव्हलपर्स प्रा. लि. तसेच संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील जुहू परिसरात वास्तव्यास असलेले आणि २०१२ पासून रेस्टॉरंट व्यवसायात कार्यरत असलेले किशोर बलराम निचाणी (६५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून अतुल अशोक रुइया, गायत्री अतुल रुइया, शिशिर श्रीवास्तव, अमित साठे, राजीव मल्ला, दिपेश गांधी, सौरभ सिन्हा, अमित कुमार, गौरव शर्मा आणि आशिष पटेल या १० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू-तारा रोडवर निचाणी यांचे दोन रेस्टॉरंट असून, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी पुण्यातील मॉलमध्ये प्रीमियम रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अमित साठे याच्याशी ओळख झाल्यानंतर विमाननगर येथे उभारण्यात येत असलेल्या ‘इस्ट कोर्ट फिनिक्स मार्केट सिटी’ प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रँड्स व लक्झरी रेस्टॉरंट्स असतील, असे आमिष दाखवण्यात आले. मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवत निचाणी यांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले.
त्यानुसार मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील युनिट क्रमांक १ ते १० खरेदी करण्याचा करार झाला. एकूण २,६४३ चौरस फूट कार्पेट एरिया असल्याचे सांगण्यात आले. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी ११ लाख रुपये टोकन देण्यात आले. त्यानंतर २०१२ व २०१३ मध्ये नोंदणीकृत विक्री करार करत एकूण ३ कोटी ८५ लाख ५३ हजार ८७५ रुपये पूर्ण अदा करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष ताबा घेतल्यानंतर आर्किटेक्टने मोजमाप केल्यावर मंजूर जागेपेक्षा १९३ चौरस फूट कमी जागा देण्यात आल्याचे उघड झाले. वारंवार पाठपुरावा करूनही अतिरिक्त जागा देण्यात आलेली नाही. तसेच टेरेस-१ व टेरेस-२ देण्याचे तसेच १५ वर्षांचा भाडेकरार करण्याचे आश्वासन देऊनही ते अद्याप अपूर्ण आहे.
कम्प्लीशन सर्टिफिकेट नसतानाही मनमानी पद्धतीने मेंटेनन्स व कॉमन एरिया चार्ज आकारून सुमारे ४७ लाख रुपयांची अतिरिक्त वसुली केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मंजूर आराखड्याच्या विरोधात बांधकाम, सोसायटी नोंदणी न करणे व कन्व्हेयन्स डीड न करणे आदी गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत.
या प्रकरणात फिनिक्स मिल्स लिमिटेड, वमोना डेव्हलपर्स प्रा. लि. तसेच अतुल रुइया, गायत्री रुइया यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीमुळे एकूण सुमारे २५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा निचाणी यांनी केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माने करत आहेत.