Pune Crime : ..तेव्हा कारवाई केली असती, तर आज माझा बाप मेला नसता; कुटुंबीयांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:44 IST2026-01-04T12:44:28+5:302026-01-04T12:44:44+5:30
त्यांनी पैसे खाल्ले आहे. त्याचवेळी कारवाई केली असते तर आज माझा बाप मेला नसता... हे सर्व घडलं नसत; असं म्हणत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहे.

Pune Crime : ..तेव्हा कारवाई केली असती, तर आज माझा बाप मेला नसता; कुटुंबीयांचे गंभीर आरोप
पुणे - कुख्यात टिपू पठाणसोबतच्या मकोका गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीने कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीट परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी सादिकने तब्बल ३० ते ३३ पानांची सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये हडपसर परिसरातील एका माजी नगरसेवकाचे नाव स्पष्टपणे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलतांना कुटूंबातील लोकांनी आपली भूमिका मांडली, ते म्हणाले,'सुधाकर जोधपूरकर यांची जागा घेतली, आणि त्यानंतर जोहूर सय्यद, आणि इनामदार आमच्या मागे लागेल. त्यांनी पैसे खाल्ले आहे. त्याचवेळी कारवाई केली असते तर आज माझा बाप मेला नसता... हे सर्व घडलं नसत; आमच्यावर खोटे आरोप केले जात आहे. २ ० २ १ २ पासून हे आम्हाला त्रास देत आहे. आमच्यावर खोटे आरोप केले होते.आम्हाला ५ ० लाखांची खंडणी मागितली होती. योग्यवेळी कारवाई करण्यात आली असती तर आज माझ्या वडिलांचा जीव गेला नसता. असं म्हणत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहे.
दरम्यान, सादिकचा ईस्ट स्ट्रीट येथील कुमार पॅलेस सोसायटीमध्ये २८ क्रमांकाचा गाळा असून, तेथेच त्याचे कार्यालय होते. याच कार्यालयात त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सादिकला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिपू पठाण हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड असून, तो सध्या मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात कारागृहात आहे. सादिक कपूर याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि तो या प्रकरणात फरार होता. दरम्यान, सुसाईड नोटमध्ये माजी नगरसेवकासह इतर काही व्यक्तींच्या नावांचाही उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.