Pune Crime : डॉन आहे मी... नादी लागू नका; तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:14 IST2026-03-31T13:12:51+5:302026-03-31T13:14:02+5:30
- पुण्यात तडीपार गुंडाची बाईक रॅली; पोलिसांना खुले आव्हान

Pune Crime : डॉन आहे मी... नादी लागू नका; तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण
पुणे : शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडानेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून बाईक रॅली काढत परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
खराडी परिसरात रामनवमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमादरम्यान आरोपी निखिल मधुकर कांबळे (वय 23, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा आपल्या समर्थकांसह मोठ्या आवाजात गाणी वाजवत दाखल झाला. “डॉन आहे मी, बाप आहे मी” आणि “रगेलच्या नादी लागू नका” असे डायलॉग देत त्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तरीही तो उघडपणे फिरताना दिसत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीचे काही साथीदारही मोक्का अंतर्गत गुन्ह्यांमध्ये फरार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस प्रशासनाने तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.