धरणाच्या पाण्यातून मृतदेहाचे ३० तुकडे शोधणे आव्हानात्मक
By नितीश गोवंडे | Updated: May 15, 2025 10:08 IST2025-05-15T10:07:50+5:302025-05-15T10:08:31+5:30
- घरातून निघाल्यानंतर सिंहगडाच्या दिशेने पायी जाणे हा त्यांचा नित्यक्रम. मात्र, ती सकाळ त्यांच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली.

धरणाच्या पाण्यातून मृतदेहाचे ३० तुकडे शोधणे आव्हानात्मक
पुणे : सरकारी बांधकाम व्यावसायिक असलेले विठ्ठल सखाराम पोळेकर हे नेहमीप्रमाणे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पोळेकरवाडी येथील घरातून सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाले. घरातून निघाल्यानंतर सिंहगडाच्या दिशेने पायी जाणे हा त्यांचा नित्यक्रम. मात्र, ती सकाळ त्यांच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली. त्याच गावातील सरपंच महिलेच्या गुंड नवऱ्याने नियोजन करून त्यांचे कारमधून अपहरण केले. अपहरण केल्यानंतर ४६ मिनिटांत आरोपींनी पोळेकर यांचा खून केला. वडील बराच वेळ झाला तरी घरी आले नसल्याने त्यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिस तपासात पोळेकर यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोळेकर यांचा मृतदेह नेमका कुठे आहे, तो नष्ट केला असेल तर कसा केला याचा उलगडा होणे महत्त्वाचे होते. खंडणीसाठी सरकारी बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने संपूर्ण पुणे हादरून गेले होते.
हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपासाला सुरूवात केली. पोलिसांना पोळेकर यांच्या मृतदेहाचे आरोपींनी २५ ते ३० तुकडे केले असून, ते खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकले असल्याची माहिती समजली. त्यानंतर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना पानशेत धरणातून (सुमारे १० ते १२ किमी लांब अंतरावर) मृतदेहाचे तुकडे सापडले. त्यानंतर पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न केला प्रकार...
दरम्यान, अपहरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या स्विफ्ट कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरूवात केली. पोळेकर घरातून निघाल्यापासून संबंधित कारमध्ये त्यांना बसवून, एका गेटमधून धरणाच्या पाण्याकडे गाडी जाताना, पुन्हा काही वेळाने ती कार गेटबाहेर पडत असताना, त्यानंतर ती कार शहराबाहेर नाशिककडे जाणाऱ्या रोडपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी शोधून काढले. त्यामुळे आरोपी नाशिककडे गेल्याची पोलिसांना खात्री झाली.
आरोपी खून करून नाशिकमार्गे जबलपूरला..
तक्रार दाखल करतानाच पोळेकर यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांनी गँगस्टर बाबू ऊर्फ योगेश किसन भामे याच्यावर संशय व्यक्त केला होता. भामे याने पोळेकर यांना खंडणी (जग्वॉर कार अथवा २ कोटी) मागितली होती. ती देण्यास विठ्ठल पोळेकर यांचा विरोध असल्याने १४ नोव्हेंबरच्या पूर्वी देखील भामेने पोळेकर यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नव्हता. त्यापूर्वी देखील भामे टोळीने पोळेकर यांच्या कारचा पाठलाग करणे, धमक्या देणे असे प्रकार केले होते. दरम्यान, मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर हे कृत्य भामे गँगनेच केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासामार्फत आरोपींचा शोध घेतला असता ते नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि तेथून पुढे जबलपूरला गेले असल्याचे स्पष्ट झाले.
भावाला पाठवले सोलापूरला..
मुख्य आरोपी योगेश भामे याने पोळेकर यांचे अपहरण करून खून केला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ बाळा ऊर्फ रोहित किसन भामे हा देखील नियोजनात सहभागी होता. प्रत्यक्ष खुनावेळी भामेसोबत शुभम पोपट सोनवणे (२४, रा. चिंचली गुरव, जि. अहिल्यानगर) आणि मिलिंद देविदास थोरात (२४, रा. अहिल्यानगर) यांचा समावेश होता. खुनानंतर योगेश भामे याने त्याचा भाऊ रोहित याला सोलापूरला पाठवले. मुख्य आरोपी आणि त्याच्यासोबतचे दोघे जबलपूर येथे रेल्वेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी आरपीएफच्या मदतीने मिलिंद थोरात आणि शुभम सोनवणे यांना पकडले. त्यावेळी योगेश तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पैसे संपताच महाराष्ट्रात धाव..
पोलिसांनी गँगस्टर योगेश भामे याला होणारा पैशांचा पुरवठा थांबवला. दरम्यान, त्याला पोळेकर यांची संपूर्ण माहिती देणारा त्यांचाच नातेवाईक रामदास दामोदर पोळेकर हा असल्याचे निष्पन्न झाले होते. योगेश भामे हा पोलिस एन्काउंटर करतील या भीतीने तसेच त्याच्याकडील पैसे संपताच तो महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आला. याची माहिती हवेली पोलिसांना समजताच त्याला कोल्हापूर येथून पुण्याकडे येत असताना सापळा लावून घटनेच्या दीड महिन्यानंतर अटक केली.
भामे गँगची डोणजे गावात दहशत..
योगेश भामे व त्याच्या गँगने सिंहगड रोड, डोणजे परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. भामेवर मारहाणीचा पहिला गुन्हा २०११ साली दाखल झाला. त्यानंतर अपहरण, मारहाण, मारमारी, फसवणूक, ताबेमारी यासह २ आर्म ॲॅक्टचे देखील गुन्हे दाखल आहेत. त्याने पत्ता बदलून २०२३ मध्ये आर्म लायसन्स देखील घेतले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी भामे व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून, सध्या पोळेकर खून प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे.
या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग...
घडलेला गुन्हा हा अत्यंत गंभीर होता. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक सागर पवार, पोलिस कर्मचारी दीपक गायकवाड, गणेश धनवे, संतोष तोडकर, संतोष भापकर, सचिन गुंड, महेंद्र चौधरी, संजय सुतनासे यांच्यासह या प्रकरणी हवेली पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेची देखील मदत मिळाली.
घडलेला प्रकार गंभीर होता. आरोपींनी अपहरण करून अवघ्या काही मिनिटांत विठ्ठल पोळेकर यांचा खून केला. पोळेकरांना पैसे मागितल्यानंतरही ते देत नाहीत. आपल्याला घाबरतही नाहीत हा राग आरोपींना होता. हे कृत्य करण्याच्या काही महिने आधीपासून आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. बॉडीचे तुकडे सापडल्यानंतर आम्हाला खून करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे (मोठे कोयते) शोधून जप्त करणे देखील महत्त्वाचे होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
- सचिन वांगडे, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे