गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच;महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:38 IST2025-10-08T09:38:18+5:302025-10-08T09:38:47+5:30
टिपू पठाण व त्याचे साथीदार यांनी अवैध मार्गाने लाखो रुपयांची मालमत्ता कमावलेली असल्याचे तपासादरम्यान उघड झाले

गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच;महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
पुणे : हडपसर परिसरात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच येणार असून, काळेपडळ पोलिसांनी केलेल्या घरझडतीमध्ये वेगवेगळ्या जागेचे कागदपत्रे, किमती देखाव्यांचे वस्तू, चैनीच्या वस्तू मिळून आल्या आहेत. तसेच पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पठाणच्या सय्यदनगर परिसरातील अनधिकृत कार्यालयाच्या बांधकामावर बुलडोझर फिरविण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील टोळ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांचे आर्थिक पुरवठ्याचे मार्ग रोखण्यासह त्यांनी अवैधमार्गाने मिळविलेल्या बेहिशोबी संपत्तीवर टाच आणण्याची मोहीमही हाती घेतली आहे. त्यानुसार, हडपसर परिसरामध्ये दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण व त्याच्या टोळीतील इतर साथीदार यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
टिपू पठाण व त्याचे साथीदार यांनी अवैध मार्गाने लाखो रुपयांची मालमत्ता कमावलेली असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार टिपू पठाण याचे व त्याचे साथीदार यांचे मालकीची १ चारचाकी इनोव्हा कार आणि ३ दुचाकी जप्त करून त्याच्या सय्यदनगर परिसरातील अनधिकृत कार्यालयाचे बांधकामावर महापालिकेच्या मदतीने बुलडोझर फिरविण्यात आला आहे. तसेच टिपू पठाण याचे घरझडतीमध्ये वेगवेगळ्या जागेचे कागदपत्रे, किमती देखाव्यांचे वस्तु, चैनीच्या वस्तू मिळून आल्या.