Video : शिरूर तालुक्यात गर्भलिंग निदानाचा भंडाफोड..! ‘लाईफ केअर क्लिनिक’ सील; डॉक्टरसह दलालावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:21 IST2026-03-05T12:21:04+5:302026-03-05T12:21:04+5:30
- हा प्रकार केवळ वैद्यकीय नीतिमत्तेचा भंग नसून माहिती तंत्रज्ञान कायद्यालाही धरून गंभीर गुन्हा मानला जात आहे.

Video : शिरूर तालुक्यात गर्भलिंग निदानाचा भंडाफोड..! ‘लाईफ केअर क्लिनिक’ सील; डॉक्टरसह दलालावर कारवाई
वाघाळे : ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ‘लाईफ केअर क्लिनिक’मध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचण्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य प्रशासन आणि गृह विभागाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (दि.४ ) संयुक्त कारवाई करत क्लिनिकवर छापा टाकला आणि संपूर्ण दवाखाना सील केला.
या कारवाईत बीएएमएस पदवीधारक डॉ. आकाश सुभाष मलगुंडे यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या या क्लिनिकमध्ये ‘गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध)’अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
वाघोली पोलिस घटकातील महिला पोलिस हवालदार प्रतीक्षा पानसरे यांनी काल्पनिक रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये प्रवेश करून या गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाने तांत्रिक पुरावे गोळा केले.
मोबाईल ॲपद्वारे लिंग निदान
तपासात असे निष्पन्न झाले की, केसनंद येथील नरेंद्र ठाकरे या दलालाच्या मध्यस्थीने आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या साहाय्याने गर्भस्थ अर्भकाचे लिंग निदान केले जात होते. हा प्रकार केवळ वैद्यकीय नीतिमत्तेचा भंग नसून माहिती तंत्रज्ञान कायद्यालाही धरून गंभीर गुन्हा मानला जात आहे.
गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त
छाप्यात औषध प्रशासनाच्या कक्षेबाहेरील गर्भपाताच्या गोळ्यांचा अनधिकृत साठा तसेच काही वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली. क्लिनिकमधील सर्व साहित्य पंचनामा करून सील करण्यात आले आहे.
ही कारवाई आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांच्या उपस्थितीत पार पडली. क्राईम ब्रँच युनिट-७ चे डीसीपी राजेंद्र मुळीक व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
फौजदारी कारवाईचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
सदर प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेसह विशेष कायद्यांनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पुढील माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने स्पष्ट केले आहे.