Video : पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाला धक्का; ट्रॅफिक सिग्नलच्या ३४ बॅटऱ्या लंपास, टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:20 IST2026-02-01T15:19:44+5:302026-02-01T15:20:46+5:30

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वानवडी पोलिसांनी चौघांना पकडले असून, पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Pune Crime Gang arrested for stealing batteries from traffic control boxes | Video : पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाला धक्का; ट्रॅफिक सिग्नलच्या ३४ बॅटऱ्या लंपास, टोळी जेरबंद

Video : पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाला धक्का; ट्रॅफिक सिग्नलच्या ३४ बॅटऱ्या लंपास, टोळी जेरबंद

पुणे : शहरातील ट्रॅफिक सिग्नलच्या चौकात ट्रॅफिक कंट्रोल बॉक्समधील तब्बल ३४ बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले. पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सिग्नल या बॅटरीवर चालू राहतो. या बॅटऱ्यांना सेन्सर बसविला असल्याने कंपनीला बॅटऱ्या चोरीला गेल्याची लगेच माहिती मिळाली. तसेच त्याच वेळी चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वानवडी पोलिसांनी चौघांना पकडले असून, पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

रिक्षाचालक दीपक अमोल कांबळे (वय ३२, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), चांद उस्मान शेख (२८, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), विकास ऊर्फ टकल्या विजय माने (३६, रा. अरोरा टॉवर्सजवळ फूटपाथ, कॅम्प) आणि अली मुल्ला शेख (२७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्स व त्यामधील बॅटरी बसविणे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एक खासगी कंपनी पाहते. वानवडी परिसरातील एएफएमसी चौक, रेसकोर्स चौक व काळुबाई चौक या सिग्नलच्या चौकातील ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्समधील सहा बॅटऱ्या चोरीला गेल्याची तक्रार २७ जानेवारीला कंपनीने वानवडी पोलिस ठाण्यात दिली होती. वानवडी पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक व उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती काढण्याचे काम सुरू केले होते. पोलिस अंमलदार आशिष कांबळे व बालाजी वाघमारे यांना ३० जानेवारीला त्यांच्या सूत्रांकडून बातमी मिळाली की, दीपक कांबळे व त्याचे तीन मित्रांनी सिग्नल बॉक्समधील बॅटऱ्या चोरल्या असून, ते विक्री करण्यासाठी रिक्षामधून फिरत आहे. सध्या ते शेवकर वस्तीजवळील रेल्वे फाटकाजवळ कचरा डेपोसमोर थांबले आहेत. या बातमीची खात्री केल्यानंतर पोलिस पथक तेथे पोहोचले. त्यांनी रिक्षामध्ये बसलेल्या चौघांना जागीच पकडले. रिक्षामध्ये एक लोखंडी कटावणी व १ लाख ६८ हजार १०० रुपयांच्या एकूण ३४ बॅटऱ्या मिळून आल्या. गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षादेखील पोलिसांनी जप्त केली. 

रिक्षामधून जप्त केलेल्या बॅटरी या काळुबाई चौक, एएफएमसी चौक, रेसकोर्स चौक, बी. टी. कवडे चौक, शास्त्रीनगर व सांदलबाबत चौक, धोबी घाट चौक आणि सिटी प्राईट/ पुष्पमंगल चौक तेथून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व चोऱ्या त्यांनी गेल्या १० ते १५ दिवसांत केल्या असून, त्याबाबत वानवडीमध्ये २, लक्ष्मीनगर, लष्कर व मार्केटयार्ड पोलिस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Web Title : पुणे: ट्रैफिक सिग्नल की बैटरी चुराने वाला गिरोह गिरफ्तार

Web Summary : पुणे पुलिस ने 34 ट्रैफिक सिग्नल बैटरी चुराने वाले चार लोगों के गिरोह को गिरफ्तार किया। इन बैटरियों का इस्तेमाल बैकअप पावर के तौर पर किया जाता था और इन्हें शहर भर के ट्रैफिक कंट्रोल बॉक्स से चुराया गया था। पुलिस ने सीसीटीवी फुटेज का इस्तेमाल कर आरोपियों को पकड़ा और पांच मामले सुलझाए।

Web Title : Pune: Gang Arrested for Stealing Traffic Signal Batteries

Web Summary : Pune police arrested a gang of four for stealing 34 traffic signal batteries. The batteries, used as backup power, were stolen from traffic control boxes across the city. Police used CCTV footage to nab the culprits, solving five cases.