Pune Crime : मदतीचा बहाना करत एटीएम कार्ड बदलून ८० हजारांची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:27 IST2025-08-23T18:26:54+5:302025-08-23T18:27:05+5:30
ज्येष्ठाला मदतीचा बहाना करत त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेत, पिन कोड विचारून ५ हजार रुपये एटीएममधून काढून दिले.

Pune Crime : मदतीचा बहाना करत एटीएम कार्ड बदलून ८० हजारांची केली फसवणूक
पुणे : ज्येष्ठ नागरिकाला एटीएम केंद्रामधून पैसे काढून देण्याचा बहाना करत ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवार पेठ येथील ७१ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २२) तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे टिळक रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तेथे आली. तिने ज्येष्ठाला मदतीचा बहाना करत त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेत, पिन कोड विचारून ५ हजार रुपये एटीएममधून काढून दिले.
त्यानंतर आरोपीने त्याच्याजवळील दुसरे एटीएम कार्ड ज्येष्ठ नागरिकाला देत, त्यांचे एटीएम कार्ड स्वत:जवळच ठेवले. ज्येष्ठ नागरिक तेथून गेल्यानंतर आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करत ८० हजार रुपये काढले. पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिरसाट करत आहेत.