सरकारी कार्यालयातून योजना मिळवून देतो असे सांगून महिलेची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:17 IST2025-03-25T10:17:11+5:302025-03-25T10:17:36+5:30
पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

सरकारी कार्यालयातून योजना मिळवून देतो असे सांगून महिलेची केली फसवणूक
ओतूर : सरकारी कार्यालयाकडून वेगवेगळ्या योजना मिळवून देतो, असे सांगून एका महिलेची फसवणूक करणाऱ्या इसमावर ओतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
याबाबत सुशीला धोंडीभाऊ जाधव (५०, रा. ओतूर, कातकरी वस्ती, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश रघुनाथ मुकणे (रा. खालचा माळीवाडा, ता. जुन्नर) याच्या विरोधात ओतूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुशीला जाधव या कातकरी आदिवासी समाजातील गरीब महिला असून, त्यांना आरोपी राजेश मुकणे याने शासकीय कार्यालयाकडून शासकीय जमीन तुमच्या नावावर करून देतो, असे खोटे सांगून पंधरा हजार रुपये घेतले. तसेच आरोपी मुकणे याने आणखी इतर कातकरी समाजातील गरीब महिला व पुरुष यांच्याकडून त्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव (ता. आंबेगाव) माझी तेथे ओळख आहे, येथून विविध योजना मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून काही रोख व ऑनलाइन स्वरूपात रक्कम घेऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. अशा प्रकारच्या दिलेल्या फिर्यादीवरून ओतूर पोलिस स्टेशन येथे सदरचा गुन्हा दाखल झाला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार भरत सूर्यवंशी हे करीत आहेत.