Pune Crime : तडीपार गुंडासह चौघे गजाआड; सराईताकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:16 IST2025-10-03T19:15:55+5:302025-10-03T19:16:32+5:30
चौकशीत आरोपी अमर गाडे याने स्वसंरक्षणासाठी मित्रांसोबत मध्यप्रदेश येथे जाऊन ११ मे रोजी पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली.

Pune Crime : तडीपार गुंडासह चौघे गजाआड; सराईताकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या सराईतासह चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, तीन काडतुसे तसेच कार जप्त करण्यात आली.
अमर हनुमंत गाडे (२९, रा. थिटे वस्ती, खराडी), गोपाळ संजय यादव (२६), सनी संजय यादव (२७, दोघेही रा. कामठीपुरा, हनुमान मंदिर शेजारी, ता. शिरूर) आणि निशांत भगवान भगत (२७, रा. भेकराईनगर, पापडे वस्ती, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी गाडे याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच एक कारदेखील जप्त करण्यात आली. आरोपी गोपाळ यादव याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर तो शहरात वास्तव्य करत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकातील (पथक दोन) पाेलिस उपनिरीक्षक गौरव देव यांना खबऱ्याने दिली. यादव आणि साथीदार हे हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरातून कारमधून निघाले होते. मंतरवाडी फाटा परिसरात पोलिसांच्या पथकाने सापळा लावून यादव याच्यासह चौघांना अटक केली.
पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केली. चौकशीत आरोपी अमर गाडे याने स्वसंरक्षणासाठी मित्रांसोबत मध्यप्रदेश येथे जाऊन ११ मे रोजी पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यासाठी आरोपी सनी यादव याने पैसे दिले होते. खंडणी विरोधी पथकाचे पाेलिस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव देव, पोलिस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, सचिन रणदिवे, किरण पडयाळ, चेतन आपटे, दिलीप गोरे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, गणेश खरात आणि पवन भोसले यांनी ही कामगिरी केली. आरोपींविरोधात फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक महेश नलावडे पुढील तपास करत आहेत.