लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:15 IST2026-02-11T19:14:56+5:302026-02-11T19:15:19+5:30
- मोबाईल लुटणारे चार आरोपी ८ तासांत जेरबंद

लोणी काळभोरमध्ये वॉकिंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला;चार आरोपी जेरबंद
लोणी काळभोर (पुणे) - लोणी काळभोर परिसरात वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला करून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या आठ तासांत चारही आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जाचक वस्ती परिसरात घडली. महादेव रामभाऊ कापसे (वय ६३) हे मित्रासोबत रिव्हरव्ह्यू सिटीमागील रेल्वे लाईनजवळ चालत असताना मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी त्यांना अडवले.
आरोपींनी शिवीगाळ करत खिशातील मोबाईल आणि पैसे देण्याची धमकी दिली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी दगड, पाईप आणि दांडक्याने त्यांच्या डोक्यावर व शरीरावर बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने कापसे बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी सुमारे ७ हजार रुपयांचा मोबाईल लुटून घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल जाधव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात आली.
अखेर गंगानगर परिसरातून सुजल झेंडे (२०), शुभम चव्हाण (२४), ओंकार चिंतलु (३१) आणि अभिजीत सोनकांबळे (२०) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या असून एकूण सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.