बारामती (सांगवी) - मजुरी करणाऱ्या एका तरुणाच्या आईकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या रागातून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील खांडज गावात उघडकीस आली आहे. मयताचे नाव मारुती साहेबराव रोमन (वय ५८) असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.ही घटना माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ७ मे रोजी सकाळी खांडज शिवारातील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर इजा दिसून आली. त्याच्या गळ्यात काळ्या रंगाची साडी व त्यात दगड बांधलेले होते. मृतदेहाची ओळख शिवाजी साहेबराव रोमन यांनी त्यांचा भाऊ मारुती रोमन असल्याचे सांगून पटवून दिली.पोलीस तपासात निष्पन्न झाले की मयत मारुती रोमन यांनी मजुरी करणाऱ्या नवनाथ घोगरे यांच्या आईकडे शरीरसुखाची मागणी केली होती. ही गोष्ट मुलगा नवनाथला समजल्यावर त्याने रागात येऊन साथीदार अनिल गोविंद जाधव याच्या मदतीने मारुती यांना गोड बोलून निर्जनस्थळी नेले. तेथे डोक्यात दगड घालून खून केला. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृताचे कपडे काढून पेटवले व काही काळ ऊसाच्या शेतात मृतदेह लपवून ठेवला. शेवटी मृतदेहाचे हातपाय व साडीने मोठे दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला.या प्रकरणी नवनाथ घोगरे (२५, रा. कार्ले भाजी, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) आणि अनिल जाधव (३५, रा. आंबेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. माळेगाव पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, उपनिरीक्षक अमोल खटावकर व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून हे गुन्हेगार जेरबंद केले. या घटनेमुळे खांडज परिसरात मोठी खळबळ उडाली असून, समाजमन हादरले आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
आईकडे शरीरसुखाची मागणी; रागातून लेकाने खून करून मृतदेह विहिरीत फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:03 IST