'तो' पाकिस्तानी मोबाईल नंबर कोणाचा ? संगणक अभियंता जुबेर हंगरगेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:17 IST2025-11-15T18:11:10+5:302025-11-15T18:17:06+5:30
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर (३२) याला एटीएसने पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच अटक

'तो' पाकिस्तानी मोबाईल नंबर कोणाचा ? संगणक अभियंता जुबेर हंगरगेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी
पुणे :दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश के. एन. शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर (३२) याला एटीएसने पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच अटक केली. ‘एटीएस’ने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. ‘एटीएस’च्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. जुबेर मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. जुबेरच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. १४) संपली. त्यानंतर त्याला विशेष न्यायाधीश के. एन. शिंदे यांच्या न्यायालयात ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी हजर केले.
जुबेरकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्यात पाकिस्तानी क्रमांक सापडला आहे. त्याच्याकडून लॅपटाॅप जप्त करण्यात आला असून, मोबाइल, लॅपटाॅपची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. तांत्रिक विश्लेषणातून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. जुबेरच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात यावी, अशी विनंती एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त अनिल शेवाळे आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने जुबेरची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
जुबेरच्या संपर्कात असलेल्या १८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा एक साथीदार शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला आहे.