घरबसल्या कमवा म्हणणारी कंपनी गायब;ई-बाईकच्या आमिषाने २००० नागरिकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:09 IST2025-07-31T12:08:35+5:302025-07-31T12:09:10+5:30
पार्ट टाईम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा” या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल २००० नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

घरबसल्या कमवा म्हणणारी कंपनी गायब;ई-बाईकच्या आमिषाने २००० नागरिकांची फसवणूक
पुणे - पार्ट टाईम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा” या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल २००० नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शुशको युनिकॉर्न (Shushko Unicorn) नावाच्या कंपनीने पार्ट टाईम जॉबसाठी नागरिकांना आकर्षित करत त्यांच्या नावावर कर्ज उभं केलं आणि त्यानंतर ना पगार दिला ना ई-बाईक. स्वारगेट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फसवणूक झालेल्या अनेक तक्रारदारांनी आज पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने त्यांना सांगितले की, त्यांच्या ई-बाईकच्या मार्केटिंगसाठी पार्ट टाईम काम दिलं जाईल. यासाठी फक्त नाव, कागदपत्रं आणि बँक तपशील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याच नावावर कर्ज काढण्यात आलं आणि बाईक न देता नागरिकांना थेट थकबाकीदार बनवण्यात आलं.
या फसवणुकीमुळे अनेकांच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम झाला असून, भविष्यात कर्ज मिळवणं कठीण होण्याची भीती या नागरिकांनी व्यक्त केली आहे. “आमचं नुकसान मोठं झालं आहे. कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. आता बँकांच्या नोटीस येऊ लागल्या आहेत. आम्हाला आमचे पैसे परत मिळावेत आणि या कंपनीवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी फसवणूकग्रस्तांनी केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, या प्रकारामागे आणखी कोणी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.