सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:34 IST2025-07-04T13:33:10+5:302025-07-04T13:34:31+5:30

पोलिसांना तात्काळ कारवाईचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश

pune crime citizens expected to be vigilant with implementation of safety guidelines for societies | सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा

पुणे : कोंढवा येथील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत एका २५ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एका गेटेड सोसायटीमध्ये एका व्यक्तीने स्वतःला कुरिअर बॉय म्हणून प्रवेश मिळवला आणि पीडितेच्या घरी जाऊन तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाइलवर धमकीवजा मेसेज ठेवून निर्ढावलेपणा दाखवला. डॉ. गोऱ्हे यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत करून घटनेचा सखोल तपास केला जावा, असे त्यांनी सुचवले आहे.

तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील इतर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनुभवी विधि अधिकाऱ्यांच्या मदतीने लवकर चार्जशिट दाखल करावी, अशी त्यांनी सूचना केली आहे.

या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षा व्यवस्थेची त्रुटी स्पष्टपणे समोर आली असल्याने डॉ. गोऱ्हे यांनी सुरक्षारक्षक, रजिस्टर नोंदी व प्रवेश नियंत्रण यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी सर्व गेटेड सोसायट्यांमध्ये प्रवेश नोंदणी सक्तीची करणे, बायोमेट्रिक किंवा डिजिटल लॉग प्रणाली अनिवार्य करणे आणि महिला सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक सोसायटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पोलिस प्रशासनाने ‘सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे’ तयार करून सर्व सोसायट्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशीही त्यांनी सूचना केली आहे.

Web Title: pune crime citizens expected to be vigilant with implementation of safety guidelines for societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.