३० ते ३५ पानी चिठ्ठी..! हडपसरमधील माजी नगरसेवकामुळे संपवलं आयुष्य; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:08 IST2026-01-04T19:07:59+5:302026-01-04T19:08:34+5:30
सादिक कपूर याने ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली.

३० ते ३५ पानी चिठ्ठी..! हडपसरमधील माजी नगरसेवकामुळे संपवलं आयुष्य; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : हडपसर-सय्यदनगरमधील गुंड टिपू पठाण टोळीविरोधात मकोका कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराने लष्कर भागात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) हडपसरमधील एका माजी नगरसेवकासह अन्य काही जणांची नावे आढळली आहेत. माजी नगरसेवकाने फरार आरोपीकडे ५० लाख रुपये मागितले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सादिक हुसेन कपूर (५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक फारुक यासीन इनामदार, अफान फारूक इनामदार, जहूर महंमद सय्यद (तिघे रा. सय्यदनगर, हडपसर), तन्वीर इब्राहीम मनियार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबबात कपूर यांचा मुलगा साजिद (२७, रा. ख्वाजा मंझील, सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर याचे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत कार्यालय आहे. कपूर जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करायचा. शनिवारी (दि. ३) सायंकाळी त्याने कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
सादिक कपूर याने आत्महत्या करण्यापूर्वी ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली. ‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सय्यदनगर परिसरात टिपू पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाण याच्या टोळीचा सादिक हा सदस्य होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता.