Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:38 IST2025-12-08T15:35:59+5:302025-12-08T15:38:08+5:30
पुण्यात एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड आणि तिच्यापासून दूर रहा, असे सांगितल्यानंतर संतापलेल्या बॉयफ्रेंडने सहा जणांच्या मदतीने त्याची हत्या केली.

Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले
पुण्यातील चंदनगरमध्ये असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. १८ वर्षीय लखन ऊर्फ सोन्या सकट असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
१८ वर्षीय लखन बाळू सकट यांच्या मावसबहिणीसोबत यश नावाच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. त्यावरूनच लखनने यश गायकवाडला तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. 'बहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोड आणि तिच्यापासून लांब रहा', असे तो यशला सातत्याने सांगत होता.
पार्कमध्ये बोलवलं आणि..., शनिवारी काय घडलं?
६ डिसेंबर रोजी लखन आणि यश यांच्यात प्रेमप्रकरणावरूनच वाद झाला. यश रागात होता. त्याने भांडण मिटवायचे आहे, असे म्हणत लखनला भेटायला बोलवले. लखन सायंकाळी ऑक्सिजन पार्क उद्यानात आला.
यशने त्याच्या मित्रांनाही बोलावले होते. पार्कमध्ये भेटल्यानंतर लखन आणि यश यांच्यात वाद सुरू झाला. वादातच यश आणि त्याच्या मित्रांनी लखनवर धारदार शस्त्राने हल्ला केला. २९ वार लखनवर करण्यात आले. त्यानंतर यश आणि त्याचे मित्र पळून गेले.
लखनची हत्या करणारे आरोपी कोण?
पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा तिथे रक्ताचा सडा पडलेला होता. पण, जखमी लखनबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयांशी संपर्क साधणे सुरु केले. त्यात एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे कळले.
घटनेची माहिती आणि आरोपींबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ६ तासांमध्येच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली. या प्रकरणात केशव बबन वाघमारे यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी शंकर दारकू (वय २०), यश रवींद्र गायकवाड (वय १९), जानकीराम परशुराम वाघमारे (वय १८), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९), बालाजी आनंद (वय १९) आणि करण निवृत्ती सरवदे (वय १८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.