Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:42 IST2025-12-15T11:39:43+5:302025-12-15T11:42:47+5:30
Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये विद्यार्थ्यांमधील वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात शिक्षक शिकवत असताना भांडण झाले, त्यातूनच धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
राजगुरूनगरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी दहावीचे विद्यार्थी क्लाससाठी आले होते. त्याचवेळी मुलांमधील वाद उफाळला आणि त्यातून एकाची हत्या करण्यात आली.
एका खासगी क्लासमध्ये शिकवणी सुरू होती. शिक्षक शिकवत असतानाच काही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यातून एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने वार केले. एका विद्यार्थ्याचा गळाच चिरला. त्यामुळे वर्गात रक्ताचा सडा पडला.
अचानक झालेल्या या प्रकाराने सगळेच हादरले. एक विद्यार्थी स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर पळाला. त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. गळा चिरल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुष्कर शिंगाडे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, एक विद्यार्थी या हल्ल्यात जखमी झाला आहे.
हल्ला करणारा विद्यार्थी घटनास्थळावरून फरार झाला. तो दुचाकीवरून पळून गेला. हल्ला करणारा त्याच्या सहकाऱ्यासोबत थेट पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने झालेल्या घटनेची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ते १४ वर्ष वयोगटातील मुले वर्गात होती. दोन वर्गाचा क्लास एकत्रच सुरू होता. त्याचवेळी हल्ल्याची ही घटना घडली. वर्गात झालेल्या या प्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खेड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.