'लग्नापूर्वी म्हणाले काही नको, नंतर...'; पत्नीची इमारतीवरून उडी,आय टी इंजिनिअर पतीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:00 IST2026-02-27T18:24:21+5:302026-02-27T19:00:30+5:30
“तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला काही नको,” असे सांगून लग्न ठरवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीसह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

'लग्नापूर्वी म्हणाले काही नको, नंतर...'; पत्नीची इमारतीवरून उडी,आय टी इंजिनिअर पतीवर गुन्हा दाखल
पुणे - वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण अजून ताजी असतानाच पुण्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्याच्या छळामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला काही नको,” असे सांगून लग्न ठरवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीसह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत विवाहितेचे नाव गंगा तेजस बेंबळकर (२७) असून ती बाणेर येथील पिओनी सोसायटीत राहत होती. तिचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (५९) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आयटी इंजिनिअर पती तेजस बेंबळकर, त्याची आई उज्ज्वला, वडील शिवा आणि बहीण रिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करत आहेत.
तक्रारीनुसार, कलबुर्गी येथील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या फिर्यादींच्या मुलीचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला. मुलाकडील मंडळींनी सुरुवातीला कोणतीही मागणी नसल्याचे सांगितले. मात्र साखरपुड्यानंतर महागडे मंगल कार्यालय, हॉटेल आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी खर्च करण्याचा दबाव टाकण्यात आला. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी स्वतःचा प्लॉट विकून लाखो रुपये खर्च केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तरीही मुलाकडील मंडळींनी लग्नात दिलेल्या आहेरावर नाराजी व्यक्त करत वारंवार अपमान केल्याचा आरोप आहे.
लग्नानंतर आठवडाभरातच गंगाने वडिलांना हुंड्याच्या कारणावरून छळ होत असल्याचे सांगितले होते. सोलापूर येथे नातेवाईकांच्या लग्नात भेट झाली तेव्हाही तिने आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीलाही फोनवर ती त्रासाबद्दल सांगत होती. १९ फेब्रुवारीच्या रात्री गंगाने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.