Pune Crime: विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:50 IST2025-07-04T12:50:39+5:302025-07-04T12:50:55+5:30
पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Pune Crime: विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ?
पुणे : बोपदेव घाटातील युवतीवरील गैंगरेप, स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणीवरील अत्याचारानंतर आता कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले आहे. पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधत कुरिअर देण्याच्या बहाण्याने आरोपीने सदनिकेत प्रवेश केला अन् पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
एका २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार २८ ते ३० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कामाला आहे. ती दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपीने दरवाजा वाजवला. तेव्हा त्याने कुरिअर बॉय असल्याची बतावणी केली.
तरुणीने कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी सदनिकेत शिरला. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे छायाचित्र काढले. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, गुरुवारी (दि. ३) सकाळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात येत घडलेला प्रकार जाणून घेतला. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
बोपदेव घाट प्रकरणाची आठवण
गेल्या वर्षी बोपदेव घाटात एका युवतीवर गँगरेपचा प्रकार घडला होता. त्यानंतर कोंढव्यातील या प्रकारानंतर पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १० ते १२ पथकांकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. आरोपी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेच्या घरी आला, त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास पीडिता शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर तिला वाटले की, तिच्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे. तिने याबाबत कुटुंबाला सांगितले, त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास तिच्या भावासोबत ती पोलिस ठाण्यात आली आणि तत्काळ आम्ही गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केल्याची माहिती उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.