Pune Crime: पुण्यात एसीबीने रचला सापळा..! ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडल कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:19 IST2026-03-21T12:12:23+5:302026-03-21T12:19:27+5:30
- पुणे एसीबीची पुरंदर पंचायत समितीत कारवाई

Pune Crime: पुण्यात एसीबीने रचला सापळा..! ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडल कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा
पुणे : महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या सासवड येथील पुरंदर पंचायत समितीतील मंडल कृषी अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला पाच हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच मागताना तो निष्पन्न झाला. अमोल सुनील सुतार (वय ३१, रा. पुरंदर रेसिडेन्सी, सासवड-सोनोरी रोड, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. मु. पो. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका ५८ वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रारदारांनी महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. हा अर्ज पुरंदर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मंडल कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्याकडे आला होता. अर्जावर साईट व्हिजिट करून अहवाल पुढे पाठविणे त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र हा अहवाल पुढे पाठवण्यासाठी सुतार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
त्यानुसार एसीबीने सापळा रचला असता, तडजोडीनंतर सुतार तीन हजार रुपयांची लाच मागताना निष्पन्न झाला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे व निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.