न्यायालयातून पसार झालेला आरोपी गजाआड; वेशभूषेत बदल करून पोलिसांना देत होता गुंगारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:43 IST2025-10-08T09:42:38+5:302025-10-08T09:43:11+5:30
आरोपी जाधवराव याच्याविरुद्ध चतुःशृंगी, कोथरूड तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

न्यायालयातून पसार झालेला आरोपी गजाआड; वेशभूषेत बदल करून पोलिसांना देत होता गुंगारा
पुणे : शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी न्यायालयाच्या आवारातून पसार झालेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्या साथीदारासह अटक केली. पोलिसांनी पकडलेला आरोपी गुन्हेगारी कथानकावर आधारित क्राइम पेट्रोल पाहून त्यानुसार वेशभूषा बदलून पोलिसांना चकवा देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अनमोल अतुल जाधवराव (३६, रा. सूरजनगर, कोथरूड डेपोजवळ, पौड रस्ता), अक्षय संजय हंपे (३०, रा. सौरभनगर, भिंगार, जि. अहिल्यानगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधवराव याच्याविरुद्ध चतुःशृंगी, कोथरूड तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला चतुःशृंगी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केली होती. त्याला १९ जुलै रोजी सुनावणीसाठी शिवाजीनगर न्यायालयात आणले होते. न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावल्यानंतर तो गर्दीतून पसार झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पसार आरोपी अनमोल जाधवराव हा मोटारीतून अहिल्यानगरमधून वाघोलीकडे येत आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार खांदवेनगर भागात सापळा लावून जाधवराव आणि त्याचा साथीदार हंपे यांना पकडले.
हंपे यांच्याविरुद्ध अहिल्यानगर येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गु्न्हा दाखल आहे. त्याला अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी जाधवराव हा गुन्हेगारी घटनावर आधारित मालिका बघायचा. पोलिस माग कशा काढतात, याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्याने वेशभूषेत बदल केला होता. तो मोबाइलही वापरत नव्हता. नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी तो मोबाइल हरविल्यची बतावणी करून नागरिकांकडील मोबाइल वापरायचा. न्यायालयातून पसार झाल्यानंतर तो नाशिक, मुंबई, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील पौड, मुळशी, हवेली तालुक्यांत वेशभूषेत बदल करून फिरायचा, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.