नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 20:33 IST2025-04-02T20:32:45+5:302025-04-02T20:33:57+5:30
आर्थिक मदत, गरजू व्यक्तींना मदत आणि नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले

नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
- किरण शिंदे
पुणे - स्वारगेट प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक अत्याचारी घटना घडली आहे.अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या सेल अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. २१ वर्षीय पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
मिळलेल्या माहितीनुसार, शंतनू कुकडे असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. २१ वर्षीय पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्ररीनंतर पोलिसांकडून शंतनु कुकडेला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कुकडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शंतनु कुकडे यांच्यावर धर्मांतरासंबंधी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कुकडे यांना पक्षातून तातडीने हटवण्याची मागणी फेसबुक पोस्ट शेअर करत केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गुजरात राज्यातील असून, कामानिमित्त पुण्यातील खडक परिसरात आली होती. ती एका गिफ्ट हाऊसमध्ये नोकरी करत होती. तिची ओळख कुकडे यांच्याशी झाली, ज्यांनी 'रेड हाऊस' नावाचे फाउंडेशन चालवतो असे सांगितले. त्यांनी आर्थिक मदत, गरजू व्यक्तींना मदत आणि नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, त्यांनी राहण्याची व्यवस्था करण्याच्या बहाण्याने तरुणीला फाउंडेशनमध्ये नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.