Pune Crime: कोरेगाव पार्कात फ्लॅटमध्ये शिरून चाकूच्या धाकाने तरुणीला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:26 IST2026-01-06T16:25:49+5:302026-01-06T16:26:01+5:30
फ्लॅटचा दरवाजा वाजवून घरात शिरून तरुणीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी साडेअकरा लाखांचे दागिने लुटले. चोरट्यांच्या मारहाणीत तरुणी जखमी

Pune Crime: कोरेगाव पार्कात फ्लॅटमध्ये शिरून चाकूच्या धाकाने तरुणीला लुटले
पुणे : फ्लॅटचा दरवाजा वाजवून घरात शिरून तरुणीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी साडेअकरा लाखांचे दागिने लुटले. चोरट्यांच्या मारहाणीत तरुणी जखमी झाली. कोरेगाव पार्क येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षांची तरुणी कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहे. चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा वाजवला. तरुणीने दरवाजा उघडताच चोरटे आत शिरले. चोरट्यांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर चोरट्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी देऊन बेडरूममधील कपाट उघडण्यास सांगून कपाटातील ११ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यादरम्यान तरुणीने चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तिला मारहाण केली.
घाबरलेल्या तरुणीला धमकावून चोरटे पसार झाले. तरुणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण पुढील तपास करीत आहेत.