"रागात का पाहत होता?" या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला;चौफुला येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:48 IST2025-10-15T20:48:10+5:302025-10-15T20:48:29+5:30
एका १९ वर्षीय तरुणावर चार जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.

"रागात का पाहत होता?" या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला;चौफुला येथील घटना
केडगाव : दौंड तालुक्यातील चौफुला (बोरिपार्धी) येथील रेणुका कला केंद्रामध्ये मंगळवारी (दि. १४) एका १९ वर्षीय तरुणावर चार जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.
''पाटस टोलनाक्यावर रागाने का पाहत होतास?'' असे विचारून हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी यवत पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील बापू जाधव (वय १९, व्यवसाय मजुरी, रा. पाटस, दौंड) हा तरुण चौफुला येथील रेणुका कला केंद्रात असताना आरोपी आदिनाथ ऊर्फ आदित्य ईश्वर गिरमे, रोहित राजू भिसे (दोघे रा. पाटस, दौंड) व त्यांचे दोन अनोळखी मित्र अशा चौघांनी त्याला हटकले.
''तू पाटस टोलनाक्यावर रागात का पाहत होता'' असे म्हणत त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने साहील जाधव याच्या डोक्यात, मानेवर व दोन्ही हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी साहील जाधव याने यवत पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याच्या जबाबावरून वरील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.