Pune Crime : बारामतीत पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाखांचा ४७० किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:43 IST2026-03-01T13:40:31+5:302026-03-01T13:43:29+5:30
पोलिस नाकाबंदीच्या भीतीने गांजा टाकून आराेपी फरार

Pune Crime : बारामतीत पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाखांचा ४७० किलो गांजा जप्त
बारामती : बारामती शहर परिसरात जळोची रस्ता भागातील एका भूखंडावर पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा ४७० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली बारामती विभागात पोलिसांच्यावतीने पाच तालुक्यांत १६ पोलिस ठाण्यांतर्गत नाकाबंदी करण्यात आली होती. या राबविण्यात आलेल्या नाकाबंदी, रात्रगस्त, वाहन तपासणी व कागदपत्र पडताळणी मोहिमेमुळे एक मोठी कारवाई यशस्वीरीत्या उघडकीस आली. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे आरोपींना तो टाकून पळ काढावा लागला. या संपूर्ण कारवाईत प्रभारी पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तत्परतेने कार्य करून मोठा अनर्थ टळला. प्रभारी पोलिस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या पोलिस पथकाच्या तत्पर कारवाईमुळे गांजाचा मोठा साठा उघड झाला आहे.
अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले, या नाकाबंदी तपासणी मोहिमेत संशयित वाहनांची तपासणी करीत अनेक वाहनांवर विविध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. शनिवारी (दि. २८) शहर पोलिसांना जळोची रस्त्यालगत एका खुल्या भूखंडात दोन ड्रम लाॅक करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जात या १५०० लिटर क्षमतेच्या ड्रमची तपासणी केली. यावेळी ड्रममध्ये गांजासदृश पदार्थ असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी या ड्रममध्ये असलेल्या पाकीट उघडून तपासणी केल्यावर यामध्ये गांजा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी दोन पंचांसमक्ष गांजा जप्त करून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस तपासणीत हा ४७० किलो गांजा असल्याचे आढळून आले. ५० हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे या ४७० गांजाची किंमत २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचे बिरादार यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. हा गांजा कोठून आणला, कोणकोणत्या ठिकाणी हा पोहोचविला जात होता, याचा प्रामुख्याने शोध घेतला जाणार आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.