Pune Crime: पुण्यात बापानेच घोटला 28 वर्षीय मुलाचा गळा, कारण वाचून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 13:19 IST2023-04-14T13:19:01+5:302023-04-14T13:19:07+5:30
डोक्याला मार लागल्याने तरुण अंथरुणाला खिळून होता

Pune Crime: पुण्यात बापानेच घोटला 28 वर्षीय मुलाचा गळा, कारण वाचून बसेल धक्का...
पुणे/किरण शिंदे: पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. बापानेच आजारी असलेल्या 28 वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. आजारी मुलगा सतत बेडवर झोपून असायचा. त्यामुळेच आरोपी बापाने हे कृत्य केले. काळेपडळ येथील केतकेश्वर कॉलनीत गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
अभिजीत बाबुराव जायभाय (वय 28) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय 50) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाची आई सुनिता बाबुराव जायभाय (वय 45) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी-वडिलांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यापूर्वी अभिजीत जायभाय याच्या डोक्यात मार लागला होता. त्यामुळे तो अंथरुणाला खिळून होता. तरुण पोरगा काही काम न करता घरात झोपून असल्यामुळे पती-पत्नी सतत वाद होत होते. आरोपी बाबुराव जायभाय हा त्याचा जगून काही उपयोग नाही, आज ना उद्या हा मरणारच आहे" असे वारंवार बोलायचा. यातून नवरा बायको दोघात वाद व्हायचे.
दरम्यान आजारी असल्याने अभिजीत याचा रुग्णालयाचा खर्च देखील वाढत होता. हाच राग मनात धरून आरोपी वडिलांनी गुरुवारी दुपारी गळा आवळून त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान घर कामाला गेलेल्या फिर्यादी परत आल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात आला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत.