पुणे: शहर व उपनगरांत सुरू असलेले रेडिमिक्स व प्रीमिक्स काँक्रीट प्लँट, महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील दगड खणी, खडी क्रशरमधून हवेत मिसळणाऱ्या धूळ, धूर आणि सिमेंट कणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पुर्नविकासाची कामे, मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र त्यातून निर्माण होणारी धूळ नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. प्रदूषित हवेत वावरणाऱ्या शहरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार, ॲलर्जी तसेच इतर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, प्रशासनाने अशा प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी, धूळ प्रतिबंधक पडदे, हरितपट्टा निर्माण करणे, तसेच औद्योगिक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी होत आहे. याबरोबरच खडी, क्रश, वाळू , मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपर, हायवा ट्रक यांनी वाहतुकीदरम्यान ताडपत्रीचा वापर करणेचे गरजेचे असताना त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांवर पडणाऱ्या क्रश आणि खडीवरून वाहने घसरल्याने अपघात हाेत आहेत. त्यात जायबंदी झालेल्या अनेकांना तात्पुरत्या तर काहींना कायम स्वरूपाच्या दिव्यांगात्वाला सामोरे जावे लागले आहे. धूळ आणि सिमेंटमुळे होणारे प्रदूषण हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे संकट बनत असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
हवेत असलेले सूक्ष्म धूलीकण श्वासावाटे शरीरात प्रवेश करून सर्वप्रथम नाक, घसा आणि फुफ्फुसांवर परिणाम करतात. त्यामुळे सतत सर्दी होणे, नाक बंद राहणे, घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, सायनसचा त्रास, दम्याचे झटके आणि श्वास घेण्यास अडचण अशा श्वसनाच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. दीर्घकाळ अशा वातावरणात राहिल्यास फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. घराबाहेर पडताना एन-९५ मास्क वापरणे, घरातील धूळ नियमित साफ करणे, मुलांना धुळीच्या परिसरापासून दूर ठेवणे, पुरेसे पाणी पिणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. - डॉ. अविनाश भोंडवे, फिजिशियन, आरोग्य सल्लागार,
वाढते वायूप्रदूषण गर्भधारणेवरही विपरीत परिणाम करू शकते. संशोधनानुसार प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास विशेषत: वायूप्रदूषणामुळे अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, तसेच गर्भाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांनी शक्यतो प्रदूषण जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, बाहेर पडताना योग्य मास्कचा वापर करावा आणि घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. सकाळच्या वेळेत प्राणायाम केल्यास शरीराची ऑक्सिजन पातळी चांगली राहिल्याने गर्भातील बाळांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरेल. - डॉ. शिल्पा नाईक, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ.
लहान मुलांमध्ये मुलांमध्ये वारंवार सर्दी-खोकला, श्वास लागणे आणि छातीत घरघर होण्याचे आणि संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा धूर, बांधकामातील आणि रस्त्यावरील धूळ आदी प्रदूषणामुळे अस्थमा ट्रिगर होत असून, मुलांमध्ये नाक कोंडणे, श्वास घेण्यास तक्रारी वाढत आहेत. धुळीसोबत इतर संसर्गजन्य विषाणूही श्वासावाटे थेट शरीरात प्रवेश करतात. देशात होणाऱ्या बालमृत्यूंमागे न्यूमोनिया, वाढलेला संसर्ग आणि संबंधित गुंतागुंत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मुलांना घराबाहेर घेऊन जाताना त्यांच्या तोंडावर मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. - डॉ. सुजित पाटील, बालरोगतज्ज्ञ.
वाढत्या प्रदूषणाचा अप्रत्यक्षपणे हृदयाच्या नागरिकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. धूळ, धुराद्वारे शरीरात जाणारे कार्बन, सिमेंट मिश्रित धूलिकण शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्यातील रासायनिक घटक रक्तात मिसळे जातात. वृक्षतोडीमुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे उच्चरक्तदाब व त्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे.- डॉ. राहुल सावंत, हृदयरोगतज्ज्ञ
प्रशासनाने शहरातील प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करावी. खडी क्रशर, प्रिमिक्स काँक्रिट प्लँट लाेकवस्तीपासून दूर ठेवावेत, धूळ प्रतिबंधासाठी उपाययोजनांची कडक अमंलबजावणी करावी. बांधकामस्थळी धूळ प्रतिबंधक जाळी लावणे, नियमित पाणी फवारणी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि वृक्षारोपण यावर भर देणे आवश्यक आहे. - ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी नागरिक
Web Summary : Pune's air pollution, from construction and industries, gravely impacts residents' health. Respiratory issues, allergies surge. Experts urge stricter regulations, dust control measures, and public transport use to combat the crisis.
Web Summary : पुणे में निर्माण और उद्योगों से वायु प्रदूषण निवासियों के स्वास्थ्य पर गंभीर प्रभाव डाल रहा है। श्वसन संबंधी समस्याएं, एलर्जी बढ़ रही हैं। विशेषज्ञ संकट से निपटने के लिए सख्त नियम, धूल नियंत्रण उपायों और सार्वजनिक परिवहन के उपयोग का आग्रह करते हैं।